– न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अगरबत्ती प्रकल्पाच्या नावावर चामोर्शी येथील महिलांची फसवणूक केल्याने न्याय मागणीसाठी सदर महिलांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणसुरू केले आहे. सदर अन्यायग्रस्त महिलांना न्याय न मिळाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशी सुद्धा त्यांचे उपोषण सुरूच होते. आपल्याला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.
अन्यायग्रस्त आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी येथील नगरसेवक आशीष पिपरे यांनी राजकीय दबाव व मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली. याबाबत चौकशीची मागणी केली असता जिल्हा उद्योग केंद्रावर दबाव टाकून चौकशी रोखल्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केला आहे. तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर २३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला.
चौथ्या दिवशीही प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणास बसलेल्या चार महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे.







