– ४१ आश्रमशाळांच्या अकराशे खेळाडूंचा सहभाग ; भाडभिडी बिट उपविजेता
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शुक्रवार ,२१ नोव्हेंबर रोजी झाला. या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक ३६२ गुण प्राप्त करून कारवाफा बिट विजेता ठरला तर ३२४ गुण मिळवून भाडभिडी बिटाने उपविजेतेपद प्राप्त केले. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यातआले. मागील दोन वर्षे देखील कारवाफा बिटाने विजेता व भाडभिडी बिटाने उपविजेतेपद पटकाविले होते.
पारितोषिक वितरण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव व जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, उपविभागीय क्रीडा समन्वयक नेताजी गावळ, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले.पारितोषिक वितरणानंतर स्फूर्तीदायी गाण्यावर खेळाडूंसोबत अधिकारी व कर्मचारीही थिरकले.
सर्व स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे आदिवासी खेळाडूंना प्रकल्पस्तरावर सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.१४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले होते.
विजेत्या कारवाफा बिटात कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा ,गिरोला, गट्टा येथील अनुदानित अशा एकूण ८ आश्रमशाळांचा समावेश आहे. उपविजेत्या भाडभिडी बिटात भाडभिडी, रेगडी, मार्कंडादेव या शासकीय तर गुंडापल्ली, अड्याळ, चामोर्शी, कन्हाळगाव येथील अनुदानित अशा एकूण ७ आश्रमशाळांचा समावेश आहे.
संचालन अतुल बलगुजर तर आभार निलेश कळंब यांनी मानले.
क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, संतोष कन्नाके, विभा बागडे, मुकेश गेडाम, देविदास चोपडे, निमा राठोड, गुलाब डोंगरवार, डाकराम धोंगडे, सविता शेंडे, रामदास पिल्लारे, शारदा कोटांगले, दिनेश येरमे, भूषण खोब्रागडे, जागृती टेकाम, भास्कर वाघमारे, अनित टेंभुरकर, पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष नंदनवार, रविकांत पिपरे, सुधीर म्हशाखेत्री, संतोष गैनवार, अजय वाकडे, जितू खोब्रागडे, नवाज शहा, संदीप उसेंडी, कृपांती बोरसरे, प्रवीण पोटावी, शैलेश भैसारे, विनायक क्षीरसागर, महेश बोरेवार, आनंद बहिरेवार, अनिल सहारे, रोशन पेंद्राम,राजेश लांडगे, कार्तिकस्वामी जावळे, गणेश लेनगुरे, भूपेंद्र गेडाम आदींसह मुख्याध्यापक, अधीक्षक, क्रीडा शिक्षक, विविध समित्यांचे कर्मचारी, पंच व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.







