Home गडचिरोली आश्रमशाळा विद्यार्थी गुणवत्तेसाठी शिक्षकांना मार्गदर्शन

आश्रमशाळा विद्यार्थी गुणवत्तेसाठी शिक्षकांना मार्गदर्शन

157

– गडचिरोली प्रकल्पाचा पुढाकार ; माझी शाळा – माझा स्वाभिमान अंतर्गत प्रशिक्षण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास नागपूर विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये “माझी शाळा – माझा स्वाभिमान” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता आठ ते बारावीला शिकविणाऱ्या सुमारे ८० शिक्षकांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवार, १ सप्टेंबरला झाला. प्रशिक्षणात आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक गुणवत्ता हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता १ ते ४, इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १२ वीच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांसह प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रशिक्षणाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका वंदना महल्ले, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभा बागडे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर प्रशांत बोरकर, शिक्षा मित्र आकाश जनबंधू, भूषण निंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावी, चाचणीनंतर त्यांचे शैक्षणिक गट तयार करून गटानुसार योग्य पद्धतीने अध्यापन कसे करावे, शिकण्यातील अंतराचे प्रकार, ब्लूम टैक्सोनॉमी याबाबत प्रशांत बोरकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. टीचींग ॲट द राईट लेवल ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष विकासासोबत जोडलेली असून तिचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध गतीविधींवर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. माझी शाळा – माझा स्वाभिमान या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास आणि शिक्षकांना नव्या अध्यापन कौशल्यांची जाणीव होण्यासाठी सदर प्रशिक्षण शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांना निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

समारोपीय दिवशी विभागीय समन्वयक साईनाथ सलाम यांनी माझी शाळा माझा स्वाभिमान उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी संदीप दोनाडकर, सुधीर शेंडे, विवेक विरुटकर, काशिनाथ कुंडगीर, एन. जी. गावळ, किशोर बेझलवार, अनिल पोटे, व्ही. बी. खोब्रागडे, विष्णू चव्हाण, ए. पी. परतेकी, मनोज गजभिये, बी. एल. लंजे, पी. बी. मिरगे, ए. एम. कायंदे, डी. आर. मानकर, एम. टी. सुरपाम, सोनल कुळसंगे, नितीन साठवणे, एन. एन. जनबंधू , जे. डी. कोऱ्हाडे, प्रशांत नागुलवार, गुलाब डोंगरवार, लुमिशा सोनेवाने, प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!