– लोकशाही पद्धतीने पार पडली निवडणूक प्रक्रिया
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरातील लांझेड़ा प्रभागस्थित श्री. संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळेत गुरूवार, 31 जुलै रोजी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडून शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले. या निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.
या निवडणुकीत सदर शाळेतील इयत्ता 1 ते 5 च्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूक प्रक्रियेत शालेय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व सूचनांचे पालन करीत शाळेत मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली आणि मतदार शालेय विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली.
या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी बॅलेट पेपरच्या मदतीने निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांना मतदान केले. यात उल्लेखनीय बाब म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार विद्यार्थ्यांनी शाळेत आपला प्रचार केला.
या शालेय निवडणुकीत रचना युवराव कोवे नामक विद्यार्थिनीने प्रचंड मताधिक्यांनी विजय प्राप्त केला. तसेच देवांश कुकडकर, दक्ष नैताम, गुरूत्व नैताम, आरोही वनीकर आदी विद्यार्थी सुद्धा विजयी झाले. या सर्व विजयी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.
यात शाळा नायक म्हणून रवना कोवे आणि उपनायक म्हणून देवांश कुकडकर यांची निवड करण्यात आली. या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक रविंद्रकुमार पटले यांनी योग्यरित्या जबाबदारी पार पाडली. यावेळी सोनिया जुमनाके, पायल नैताम, अनिल सयाम, कल्याणी ढोके, पौर्णिमा खेवले आदी शिक्षक उपस्थित होते.







