– गडचिरोली प्रकल्पाचा पुढाकार : अधीक्षक व अधीक्षिकांची कार्यशाळा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व बंगळुर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲन्ड न्युरो सायन्स (NIMHANS) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पातील २४ शासकीय व २० अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी दोन बॅचमध्ये एकूण चार दिवस अधीक्षक व अधीक्षकांच्या निवासी कार्यशाळेचे आयोजन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत नुकतेच करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभा बागडे, व्ही. एस. कापसे, मुख्याध्यापिका वंदना महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे अधीक्षक व अधीक्षिकांचा सहभाग होता. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, ताण- तणावाचे कारण व परिणाम, दडपण तसेच आत्महत्या करण्यापूर्वी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जाता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संवाद कौशल्य, सामाजिक दडपण, आश्रमशाळेतील अधीक्षक व अधीक्षिका यांच्यावर असलेल्या ताण – तणावाचे धडे यावेळी देण्यात आले.
प्रकल्पातील ४४ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन करताना मानसिक आरोग्य सशक्तिकरणासाठी या कार्यशाळेचा अधीक्षक व अधीक्षिका यांना लाभ होणार आहे. डॉ. प्रभू सदमवार यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून एच. वाय. धर्मे, ए. आर. बोरकर यांनी मार्गदर्शन केले.







