गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी दुसरे प्रशिक्षण

21

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या ६८- गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान संबंधीचे दुसरे प्रशिक्षण येथील गोकुळनगरातील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १३ व १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ व दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळात आयोजित केलेले आहे.

६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्रासाठी ३६२ मतदान पथक नेमलेले आहेत. ४१ पथक राखीव आहेत. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावण्यासाठी एकूण १ हजार ६४८ मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. यापैकी ४०३ मतदान केंद्राध्यक्ष, ४०३ सहाय्यक मतदान अधिकारी, ८४२ इतर मतदान अधिकारी आहेत. पहिले प्रशिक्षण २६ व २७ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले होते. नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रशिक्षणात न चुकता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी केले आहे.