राजनगट्टा व कुंभारवाही या गावांच्या मध्यंतरी अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन चालू

187

अवैधरित्या तेंदुसंकलनाची चौकशी करून जप्तीची कार्यवाही करावी व दोषींवर दंडात्मक कार्यवाही करावी

– स्वाभिमानी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनराज वासेकर यांची वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील राजनगट्टा व कुंभारवाही या दोन्ही गावाच्या मध्यंतरी अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. या अवैधरित्या सुरू असलेल्या तेंदुसंकलनाची चौकशी करून जप्तीची कार्यवाही करावी व दोषींवर दंडात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनराज गणपती वासेकर यांनी चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
वालसरा येथे तेंदूपत्ता संकलन बंद केले व राजनगट्टा येथे सुद्धा तेंदूपत्ता संकलन बंद आहे. मागील 2 वर्षांपासून कोविड 19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध नव्हता. परंतु तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून गावातील जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु 7 मे 2022 पासून तेंदूपत्ता खराब येत आहे असे सांगून दोन्ही गावातील तेंदूपत्ता संकलन करणे बंद केले व 8 मे 2022 रोजी अवैधरित्या भाऊजी वातुजी कोहळे रा. राजनगट्टा यांच्या शेतात अंदाजे 7500 पुडा अवैधरित्या खरेदी करून रितसर गुंती लावण्यात आले आहे. त्यामुळे गावातील जनतेचा रोजगार हिरावला गेला आहे. त्याकरिता अवैधरित्या झालेल्या तेंदूपत्ता संकलनाची चौकशी करून जप्तीची कार्यवाही करण्यात यावी व अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन करण्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी सामाजिक संघटना चामोर्शीचे अध्यक्ष धनराज गणपती वासेकर यांनी चामोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.