मनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज : खा. अशोक नेते

136

– निलज ( ब्रम्हपुरी) येथील श्रीमद भागवत सप्ताहाचा उत्साहात समारोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आजच्या धकाधुकीच्या आधुनिक, विज्ञान युगात जीवन धावपळीचे झालेले आहे. ग्रामीण भागापेक्षा तर मोठ्या शहरातील जीवनमान लोकल ट्रेनसारखे आहे. यात माणसाला अर्धा तास ही निवांतपणा मिळत नाही. त्यामुळे तरुण युवक, नागरिकांमध्ये टेन्शन व चीडचिडपणा वाढलेला आहे. अशा धावपळीतून बाहेर निघून थोडा निवांत व मन स्थिर करण्यासाठी आज समाजाला भागवता सारख्या धार्मिक कार्यक्रमाची गरज आहे. यातून नागरिकांना काही दिवस का होईना पण मनाला व बुद्धीला आराम मिळते व आचार विचारांची देवाणघेवाण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे गावागावात भागवता सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व एक व्यसनमुक्त पिढी घडविण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. भागवत सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नीलज येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन 10 ते 16 एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. 16 एप्रिल रोजी या भागवत सप्ताहाचा समारोप भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरीचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिप सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे, माजी जिप उपाध्यक्ष तथा जिप सदस्य कृष्णाजी सहारे, पं. स. सभापती रामलालजी डोनाडकर, माजी सभापती वंदनाताई शेंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. बालपांडे, अशोकराव दोनाडकर, शेंडे, निलजचे सरपंच हेमंत ठाकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या भागवत सप्ताहात सातही दिवस हभप महाराजांनी विविध उदाहरणे देऊन नागरिक व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. गावातील पूर्ण वातावरण भागवतमय झाले होते. मोठ्या उत्साहात व आनंदात गोपाळ काला व दहीहंडी फोडून या भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या भागवत सप्ताहात गावातील व इतर लगतच्या गावातील नागरिक, महिला, युवक-युवती व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.