गौरीपूर येथील घरकूल लाभार्थ्यांच्या यादीची चौकशी करून ‘ड’ यादीची फेर पडताळणी करा : आमदार डॉ. देवरावजी होळी

87

– गौरीपूर येथील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केल्याबाबत आमदार डॉ. देवरावजी होळी यांना गावकऱ्यांचे निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रामपंचायत गौरीपूर तालुका चामोर्शी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रपत्र ‘ड’ च्या यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून प्रपत्र ‘ड’ यादीची फेर पडताळणी करून वगळण्यात आलेल्या घरकूल लाभार्थ्यांना तातडीने घरकूल मंजूर करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
याबाबतचे निवेदन आमदार डॉ. देवरावजी होळी यांना गौरीपूर येथील अन्यायग्रस्त गावकऱ्यांनी दिले. यावेळी निवेदन देताना गौरीपूर येथील रविन साखारी, अमूल्य हलदर, संजय मंडल, पलाशी गुंडिया, संजीत हलदार, कुमारेश विश्वास, बिरेन गुंडिया यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२२ अंतर्गत ग्रामपंचायत गौरीपूर तालुका चामोर्शी येथील ग्रामस्थांना घरकुलाचे मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रपत्र ‘ड’ यादीची पडताळणी करताना गावातील काही पात्र लाभार्थींना फोर व्हीलर, टू व्हीलर धारक व मोठे व्यावसायिक दाखवून अपात्र करण्यात आले. मात्र जे खरोखर अपात्र आहेत त्यांना पात्र करून त्यांचे घरकूल मंजूर करण्यात आले. यामुळे पात्र घरकूल धारकांवर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता अपात्र लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून त्याबाबतचे निवेदन आमदार डॉ. देवरावजी होळी यांना देण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून प्रपत्र ‘ड’ यादीची फेर पडताळणी करण्यात यावी व वगळण्यात आलेल्या घरकूल धारकांची नावे मंजूर यादीत समाविष्ट करावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.