नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान

119

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्यासह विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर अर्थमंत्र्यांचे उत्तर

– कर्जमाफीत नाव सुटलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीची रक्कम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्यासह विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तर देताना विधानसभेत केली.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. त्यातच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु त्याबाबतचा जीआर मात्र काढलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्याबाबत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. आज विधानसभेत सदर प्रश्न चर्चेला आला असता त्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केली.