पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. देवराव होळी विविध ज्वलंत प्रश्न मांडणार

25

– पत्रकार परिषदेतून दिली माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू होत आहे. त्या अधिवेशनात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आपल्या विधानसभा क्षेत्रातील जिल्हा विकासाचे विविध ३५ तारांकीत प्रश्न, १७ लक्षवेधी प्रश्न, औचित्याचे ११ मुद्दे व २ अर्धा तास प्रश्न मांडणार असून विविध प्रश्नांना उजाळा देणार आहेत, अशी माहिती गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील स्थानिक विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

पत्रकार परिषदेला लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी पंचायत समिती सभापती विलास दशमुखे, युवा मोर्चा प्रमुख अनिल तिडके, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे यांच्यासह युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वादळ वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना आर्थिक मदत देणे, वैद्यकीय बांधकामासोबतच प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, मार्कंडा देवस्थान येथे विविध बांधकाम करणे, नरभक्षक वाघांचा व हिंसक हत्तीचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, रस्ते व विविध पुलांचे बांधकाम, विविध प्रश्नांच्या माध्यमातून आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले. आपल्या विधानसभा क्षेत्रातील अनेक ज्वलंत प्रश्न विधान मंडळाच्या पटलावर मांडणार असल्याचीही माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.