– इंदिरानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच अस्पृश्यचे, विषमतेचे चटके सहन करावे लागले. त्यांना शाळेत पाणी पिण्यास मिळत नव्हते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनप्रवासात संघर्षमय जीवन जगले. या संघर्षातून त्यांनी अत्युलनीय यश संपादीत केले. आपल्या बुद्धीच्या बळावर देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारीत संविधान दिलं. त्यामुळे जीवनाचा उद्धार करायचा असेल तर प्रत्येकाने संघर्ष केलाचं पाहिजे, असे प्रतिपादन सचिन पाटील सचिव तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर यांनी केले.
इंदिरानगर येथे १४ एप्रिल २०२४ रोजी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजीत करून साजरी करण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन पर कार्यक्रमात बोलत होते. १३ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरानगर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुलांनी व रमाई महिला मंडळाच्या महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेऊन नृत्य सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून व प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली व सर्व उपस्थित जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश भानारकर, अध्यक्ष तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर तर प्रमुख पाहुणे म्हणून लालाजी वालदे, धनंजय भैसारे, शेषराव तुरे, अरविंद साखरे, स्वप्नील उंदिरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आशिष घोनमोडे, डॉ. शेषराव भैसारे, सम्बोधी खोब्रागडे, अनमोल मेश्राम, बंडू के. खोब्रागडे, देवेंद्र सोनपिंपळे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार मांडून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लालाजी वालदे, सौजन्य पेटकर, रत्नमाला शेट्ये, कविता डोंगरे यांनी भिमगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री नंदेश्वर यांनी केले. यावेळी इंदिरानगर येथील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. १४ एप्रिल २०२४ रोजी ६ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य मुलांनी उत्स्फूर्ततेने भाग घेऊन परिक्षा दिली. सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
१४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी इंदिरानगर येथील मुख्य मार्गाने ढोलताशा च्या गजरात व झांकी सादर करून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीतील झांकी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या संपूर्ण भिम जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन तथागत बौद्ध समाज मंडळ, इंदिरानगर व रमाई महिला मंडळ, इंदिरानगर यांनी केले व ते यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.