अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई

62

– छगन शेडमाके यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तब्बल आठ महिने लोटुनही वन्यप्राण्यांनी उभ्या पिकात हैदोस घालुन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. ही गंभीर बाब गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी नागपूर येथील वनविभागाच्या हरी सिंह सभागृहात वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आणून दिली असता वनमंत्र्यांनी संबंधित वनाधिकाऱ्यांना धारेवर धरून तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे सुरू झाले असल्याने शेडमाके यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलल्या जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून विविध भागांत जंगली हत्ती व रानडुक्करांनी उभ्या पिकात उत्पात मांडुन शेतकऱ्यांच्या शेतपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तसेच जिल्ह्याच्या विविध भागात जंगली हत्तींनी शेतपिकांसह शेतीपयोगी अवजारे, मोटारपंप तसेच इतरही साहित्याची नासधूस करून एका वन कर्मचाऱ्यांला चिरडून ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती.

जंगली जनावरांमुळे होत असलेली नुकसान व राहूनराहून जंगली हत्तींचा कळप शेतपिकांत तसेच गावातही शिरून घराची देखील नासधूस करीत असल्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्याचे पाहु जाता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात नागपूर येथील वनविभागाच्या हरी सिंह सभागृहात वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ११ डिसेंबर २०२३ रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.

पार पडलेल्या आढावा बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातील आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार सुभाष धोटे यांच्यासह प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख शैलेंद्र टेंभुर्णिकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, नागपूरच्या मुख्य वनसंरक्षक लक्ष्मी, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेश कुमार, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आदी वनाधिकारी तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शेडमाके यांनी तब्बल आठ महिने लोटुनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करताच वनमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कर्तव्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे वनाधिकाऱ्यांनी जुन २०२३ मध्येच नुकसान भरपाईचे धनादेश तयार करून सुद्धा नुकसानग्रस्तांना वितरीत केले नसल्याची गंभीर बाबही आता उघडकीस आली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक गंभीर बाबीही उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तदापी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे सुरू झाल्याने शेडमाके यांच्या प्रयत्नाचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे.