राज्यसरकार एक लाखापेक्षा जास्त शासकीय रोजगार देणार

53

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

– नागपुरातील नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर, 11 डिसेंबर 2023 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि रोजगाराच्या प्रतीक्षेतील तरुणांना एकत्रित आणून सेतू बांधला गेला. या माध्यमातून नमो रोजगार मेळाव्यात ६० हजार तरुणांनी विक्रमी नोंदणी केली. एकूण ७९८ कंपन्या दाखल झाल्या. या माध्यमातून सुमारे ४८ हजार ५४१ जागा भरल्या जातील. येत्या काळात राज्य सरकारमार्फत एक लाखापेक्षा जास्त शासकीय रोजगार देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यामार्फत जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून मेळाव्याचा शुभारंभ झाला. यावेळी रोजगार व उद्योजकता योजनांची माहिती देणाऱ्या “योजनादर्शी” पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, रातुम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार आशिष देशमुख, बंटी कुकडे, भाजयुमोच्या नेत्या शिवानी दाणी, टेक महिंद्राचे निखिल अल्लूरकर, अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार सिंह, माजी आमदार सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रवीण इटनकर, मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता अधिकारी सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांद्वारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश प्रगतीच्या मार्गावर असून, जगातील अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या क्रमांकावर असलेला देश आता पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. पुढच्या काळामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा उद्दिष्ट या केंद्र सरकारने ठेवलेले आहे. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे “इन्फ्रास्ट्रक्चर मॅन” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली आहे. गडकरी आणि मी दोघे मिळून मोठ्या प्रमाणात मिहानमध्ये देखील रोजगार निर्मिती करू, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. २ हजार ३०० कोटी रुपयांचे अनुदान जागतिक बँकेकडून मिळाले आहे. यातून नवीन तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गरिबी सर्वात मोठी समस्या आहे. जर देशातील गरिबी कमी करायची असेल तर रोजगार निर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. तेव्हाच हा देश खऱ्याअर्थाने समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल. 2014 ते 2023 पर्यंत 68 हजार 767 प्रत्यक्ष आणि उर्वरित 32 हजार अप्रत्यक्ष अशा एक लाख लोकांना रोजगार देण्याचे काम या सरकारने केले आहे. पुढच्या २ दोन वर्षात २ लाख रोजगार देण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी कौशल्य रोजगार विभागाने पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगत शेतीवर आधारित उद्योग आणण्याची सूचना केली.पंतप्रधान मोदी यांनी फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा निर्धार केला आहे. देशातील तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊलही टाकले आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, या मेळाव्यातून विक्रमी ऑनलाईन नोंदणी झाली. एकाच वेळी १० हजार तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्याचा उपक्रम गिनीज बुकात नोंद होईल. महाराष्ट्रातील तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्याचे रोजगार कौशल्य व उद्योजकता विभागाचे अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार सिंग यांनी सांगितले की,  2300 कोटींच्या प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. या माध्यमातून उद्दिष्ट पूर्ण करून आयटीआय आणि विद्यापीठ बळकटीकरणासाठी वर्ल्ड स्किल सेंटर निर्मिती केली जाईल. कार्यक्रमाचे आभार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मुंबईचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

दवाखाना आपल्या दारीचा शुभारंभ

जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे “दवाखाना आपल्या दारी” या योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते झाला. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात २ या प्रमाणे २६ आरोग्यवाहिका गावागावात जाऊन आरोग्यसेवा देणार आहेत. या रुग्णवाहिकांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रुग्णवाहिकेत वैद्यकीय चमू आणि आरोग्य सुविधा उपलब्ध राहणार आहे. या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा तात्काळ व सहज उपलब्ध होणार आहे.