– नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सवात मार्गदर्शन
विदर्भ क्रांती न्यूज
नागपूर : विदर्भात औद्योगिक विस्तारासाठी आणि भरभराटीसोबत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योजकांनी गुंतवणूक वाढवावी म्हणून खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन हॅाटेल सेंटर पॅाईंट येथे केले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या औद्योगिक महोत्सवात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी किती संधी आहेत यावर मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारकडून औद्योगिक समुदायाला फायदेशीर ठरणारी धोरणे आणि सुधारणा करीत आहेत. त्यामुळे विदर्भात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दिशेने इंडस्ट्रियल एक्स्पो, विदर्भाच्या औद्योगिक विकासावर कॉन्क्लेव्ह, ॲडव्हांटेज विदर्भ या विषयावर सेमिनार होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना भाजपच्या जनजाती सेलचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल ना. नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करत गडचिरोलीसारख्या मागास भागाला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी हा महोत्सव महत्वपूर्ण असल्याचे म्हटले. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आकांक्षित, अविकसित जिल्हा असतानाही गडचिरोली जिल्हात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची खनिज संपत्ती आहे. दळणवळणाच्या साधनांअभावी आतापर्यंत त्या खनिज संपत्तीमधून औद्योगिक विकासाला चालना मिळू शकली नाही. पण आता ना. गडकरी यांच्या दूरदृष्टिमुळे साडेचौदा हजार कोटी रुपयांच्या महामार्गाचे काम सुरू झाले. रेल्वेमार्गाच्या विकासालाही गती मिळाली आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कोनसरीतील लोहप्रकल्पासोबत आता इतरही उद्योजकांनी गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक करून या भागाच्या सर्वांगिन विकासाला चालना द्यावी, असे आवाहन यावेळी खा. नेते यांनी उपस्थित उद्योजकांना केले.
यावेळी मंचावर ना. नितीन गडकरी यांच्यासह खा. कृपाल तुमाने, खा. सुनील मेंढे, माजी खा. अजय संचेती, उद्योगपती सत्यनरंजी नवल, अमरावतीचे राज्यसभा डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजय शर्मा, अतुल गोयल, आशिष काळे, तसेच विदर्भातील अनेक उद्योजक उपस्थित होते.
औद्योगिक विकासातूनच येईल समृद्धी : ना. गडकरी
या खासदार औद्योगिक महोत्सवात मार्गदर्शन करताना ना. नितीन गडकरी यांनी औद्योगिकीकरणात वाढ झाल्यास विदर्भाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. लाखो बेरोजगारांना काम मिळेल. या भागात उद्योग वाढीसाठी चांगला वाव आहे. औद्योगिक विकासातूनच हा भाग समृद्ध होईल. त्यामुळे असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांनी विदर्भात आपल्या उद्योगांच्या वाढीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.