ओबीसींच्या आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक : राज राजापुरे

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३० सप्टेंबर : महाराष्ट्रात सध्या ओबीसी व मराठा आरक्षण हा विषय ऐरणीवर आहे. मराठा, ओबीसी, धनगर व इतर आरक्षणाबाबत त्या – त्या समाजांमध्ये संभ्रम व वैमनस्य पसरविण्याचे कारस्थान केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी विशेष करून ओबीसींच्या आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरे यांनी व्यक्त केले.

ओबीसी जणगणना व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भविष्यातील आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यासाठी जनाधार वाढविण्याच्या उद्देशाने ते गडचिरोली जिल्ह्यात आले असता येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राजापूरे पुढे म्हणाले की, सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाही  त्यामुळे सर्व ठिकाणी शासकिय कर्मचाऱ्यांना प्रशासक बसवून ठेवले आहेत. लोकनिर्वाचित प्रतिनिधींची दालनं कुलूप बंद आहेत आणि हे प्रशासक मनमानी कारभार करीत आहेत. नुकतेच केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. परंतू सरकारला खरोखरच त्याचा लाभ महिलांना द्यायचा आहे की केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही हे केले, असे दाखवायचा प्रयत्न आहे? कारण जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय ओबीसी महिलांना आरक्षणच मिळू शकणार नाही. एससी, एसटीप्रमाणे ओबीसी महिलांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. मराठ्यांना ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे कटिबद्ध आहेत, असेही राजापुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संघटनात्मक संरचना पूर्ण होताच जिल्हा संघटना, जिल्हा कार्यकारिणी व ग्रामीण कार्यकारिण्या घोषित करण्यात येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव एड. संजय ठाकरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, नइम शेख, अमर खंडारे, हुसेन शेख, सुरेश गोंदळे, चामोर्शी तालुका अध्यक्ष कबीर आभारे, आकाश पगाडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.