पुढच्या पिढीलाही वनसंपदा (बांबु) कायम राहील याची काळजी घेणे आवश्यक : आमदार डॉ. देवरावजी होळी

67

– बांबू कटाई व्यवस्थापन संदर्भातील समितीची बैठक संपन्न

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली व सहअध्यक्ष आमदार कृष्णाजी गजबे यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३१ जुलै : विधानसभेत घोषित केलेल्या बांबू कटाई संदर्भातील समस्याबाबत आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीची बैठक आज, ३१ जुलै रोजी मुख्य वनसंरक्षक यांच्या गडचिरोली येथील कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला समितीचे सहअध्यक्ष आमदार कृष्णाजी गजबे, गडचिरोलीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषि सिंह, गडचिरोलीचे (प्रादेशिक) वनसंरक्षक रमेश कुमार, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिष शर्मा, आलापल्लीचे उपवनसंरक्षक तथा विभागीय वन अधिकारी दक्षता (गडचिरोली वनवृत्त) शैलेश मीना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीमध्ये सामूहिक वनहक्क व पेसा अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार बांबू कटाई करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा सुचविणे, सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील वनक्षेत्रात बांबूच्या जास्त कापणीबाबत आलेल्या प्रकरणांची चौकशी करणे, बांबू रोपवन कार्यक्रमात सुधारणा करणे, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन योजना तयार करणे व अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.