राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ५०० गरजुंना ताडपत्रीचे वितरण

55

– अहेरी येथे भाजपातर्फे सेवा पंधरवाडा 

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, २९ जुलै : राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २२ जुलैपासून सेवा पंधरवड्याचे आयोजन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे. ‘सेवा’ हाच ‘संकल्प’ घेऊन देशभरात पक्ष कार्यरत आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी राज्यभर पूरग्रस्त नागरिकांना सहाय्य करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली होती. तसेच फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय सेवेसाठी पक्षातर्फे राज्यात ५० हजार रुग्णमित्र नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सेवा दिनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना अन्न वाटप व सर्वोतोपरी मदत असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पूरग्रस्तस्थिती असेपर्यंत आरोग्यसेवेचा व अन्य उपक्रम चालू राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या अनुषंगाने अहेरी येथे काल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सौजन्याने अहेरी तालुका भाजपातर्फे पावसाळ्यात ज्या लोकांच्या छतातून पाणी गळते पण त्याची सोय करण्यास सक्षम नसणाऱ्या अशा तालुक्यातील गरजवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत ताडपत्रीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील अहेरी, चिंचगुंडी, कोत्तुर, पुसुकपल्ली, छल्लेवाडा, नागेपल्ली, आलापल्ली, नंदीगाव, संड्रा, व्यंकटरावपेठा, महागाव, कन्नेपल्ली, खमनचेरू आदी गावातील जवळपास ५०० ते ६०० लोकांच्या घरांना पावसाळ्यात संरक्षण मिळणार आहे. या कार्यक्रमाकरिता माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह भाजपा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.