– लॉंग मार्च काढून इंदिरा गांधी चौकात घेतली निषेध सभा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २४ जुलै : गडचिरोली येथे 23 जुलै रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून इंदिरा गांधी चौक ते कारगिल चौक असा लॉंग मार्च काढून व इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेऊन मणिपूर राज्यात आदिवासी महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी निषेध सभेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी मणिपूर राज्यातील हिंसाचार व या घटनेस राज्य व केंद्रातील सरकारच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मणिपूर राज्यात कुकी आदिवासी महिलांची विडंबना करून व त्यांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करून ठार मारून अत्यंत निर्लज्जपणे व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तेथील मैतेयी समुदायाने 4 मे रोजी केले असताना त्याची दखल मात्र 18 मे ला घेऊन उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.
या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या सर्व नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली. निषेध सभेच्या शेवटी स्थानिक पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.