अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा

74

– खा. अशोकजी नेते यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश

– जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे खा. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया, ३ जुलै २०२३ : परिवहन अधिकारी व पोलीस विभाग यांची रस्ता सुरक्षेत महत्वाची भूमिका आहे. रस्ता सुरक्षेत विविध कारणांमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी संबंधित विभाग व रस्ते सुरक्षा संबंधित घटकांनी उपाययोजना करावी, असे निर्देश भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी दिले.

जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रस्ते अपघाताचा आढावा, रस्त्यांवर दिशादर्शक/माहितीदर्शक फलक लावणे, गतिरोधक (स्पिडब्रेकर), रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, रस्ता सुरक्षा जनजागृती, अशा विविध विषयांवर चर्चा करून काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली.

यामध्ये अपघात होण्यामध्ये ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालविणे, ट्रिबल सीट, हेल्मेट न वापरणे, रॉंग साईड गाडी चालविणे, (मद्यपी) दारु पिऊन गाडी चालविणे, गाडी चालवताना मोबाईल वापर करणे, रस्त्यांवर जनावरे असणे, लहान मुले गाडी चालविणे त्यांचा नियत्रंण नसणे, अशा विविध माध्यमातून अपघात होतात यावर उपाययोजना करून कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी खा. नेते यांनी दिले.

तत्पूर्वी खासदार सुनिलजी मेंढे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच बैठकीत उपस्थित अधिकारी व नेत्यांनी खासदार अशोकजी नेते यांना वाढदिवसाच्या निमित्याने उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार सुनिलजी मेंढे, जि. प‌. अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधिक्षक निखिल पिंपळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिवहन अधिकारी राजेश करपे, आमदार विनोद अग्रवाल, जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे, गजेंद्र फुंडे, परसराम फुंडे, आदित्य शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.