– 2 लाखांचे होते बक्षिस ; गडचिरोली पोलिस दलाच कारवाई
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने पोलिस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात एका जहाल नक्षलवाद्यास 18 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आज, मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख उपस्थित होते.
गोपनीय खबरीच्या आधारे पोलिस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गट्टा येथील जवान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी नक्षलविरोथी अभियान राबवून जहाल नक्षली साधू ऊर्फ काऱ्या ऊर्फ संजय नरोटे (वय 31, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) यास अटक केली. तो सन 2015 पासून गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य म्हणून कार्यरत होता. 28 मार्च 2023 रोजी तो दलम सोडून घरूनच नक्षलविरोथी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलिस पार्टीवर अम्ब्युश लावणे, जाळपोळ करणे, पोलिस व निष्पाप नागरिकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे 23 गुन्हे दाखल आहेत. त्यात 12 चकमक, 2 पोलिस जवानांसह एकूण 8 खून, 2 जाळपोळ व 1 दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली 2020, कोदूर 2020, टेकामेट्टा 2021, गोरगुट्टा 2021, गुंडरवाही अम्ब्युश 2020 या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 2.लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
वर्षभरात 67 नक्षल्यांना अटक
”गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोथी अभियानामुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत 67 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोथी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.”