विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : समतामुलक समाजाची निर्मिती साध्य करण्याकरीता भगवान बुध्दांने सांगीतलेली शिल आचरणाची नितांत गरज आहे. भगवान बुध्दांचा धम्म च मानवाला तारू शकतो, असे विचार धम्ममित्र महेंद्र पुणेकर यांनी व्यक्त केले. ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
इंदिरानगर येथे तथागत बौध्द समाज मंडळ इंदिरानगरतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव – २०२३ चे निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १४/०४/२०२३ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धम्ममित्र महेंद्र पुणेकर होते तर प्रमुख पाहुणे जनार्धन ताकसांडे, भोजराज कान्हेकर, प्रमाेद राऊत, वैरागडे सर, सुरेश खोब्रागडे, मनोहर बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी भगवान बुध्द, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना मालार्पण करून झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी धम्ममित्र महेंद्र पुणेकर यांना धम्म व शिलाचे आचरण यावर मार्गदर्शन केले. जनार्धन ताकसांडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व चळवळ या विषयावर मार्गदर्शन केले. भोजराज कान्हेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय समस्या व उपाय यावर मत व्यक्त केले. तसेच यावेळी प्रमोद राऊत, वैरागडे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता इंदिरानगर येथील मोठा जनसागर जमा झाला होता.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भाग्यश्री नंदेश्वर यांनी तर आभारप्रदर्शन दिवाकर उंदिरवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तथागत बौध्द समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.