धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन : डॉ. रामदास आंबटकर

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३१ डिसेंबर २०२२ : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे भारतीय जनता पार्टी अभिनंदन करत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन शिंदे – फडणवीस सरकार हेच बळीराजाचे खरेखुरे कैवारी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे विधानपरिषद आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी म्हटले आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टर १५ हजार रु. बोनस देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम थेट जमा होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून ‘’एनडीआरएफ’’तर्फे मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या दुप्पट भरपाई शेतकऱ्यांना देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रु. जमा करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे, असे अनेक निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतले आहेत.

राज्यात आतापर्यंत जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर मदत मिळत होती. पण आता हीच मदत १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मिळणार आहे. अमरावती, नागपूर, पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत, असेही रामदास आंबटकर म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले गेले होते. अतिवृष्टी, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदत केली नाही. कोरोना काळातही शेतकऱ्यांना एका दमडीचे अर्थसाह्य केले गेले नव्हते. या उलट सत्तेवर आल्यापासून गेल्या सहा महिन्यात शिंदे – फडणवीस सरकारने भरघोस मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.