– जिल्ह्यात दोन मतदान केंद्र : भरघोस मतदानासाठी जिल्हा कार्यकारिणीचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २४ डिसेंबर २०२२ : जैन कलार समाज न्यास मध्यवर्ती मंडळ नागपूरची निवडणूक रविवार, २५ डिसेंबर २०२२ रोजी आहे. मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व वडसा येथे मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मध्यवर्ती मंडळ नागपूर केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष १, उपाध्यक्ष २ ,सचिव १, सहसचिव २, कोषाध्यक्ष १, आजीवन संचालक २, महिला संचालिका २, संचालक पदे १६ (नागपूर ८ व बाहेरगाव ८) अशा एकूण २७ पदासाठी निवडणूक असून आपुलकी, प्रयास, समाज विकास व प्रगती अशा चार पॅनलचे १०८ व आजीवन संचालक पदासाठी एक अपक्ष उमेदवार असे एकूण 109 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गडचिरोली येथे आरमोरी रोडवरील तुळजाबाई प्राथमिक शाळेत मतदान केंद्र असून जिल्ह्यात दुसरे मतदान केंद्र वडसा येथील शिवाजी वार्डातील कुथे कॉन्व्हेंटमध्ये आहे. जैन कलार समाजाच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली असून उमेदवाराच्या प्रचाराची रणधुमाळी सभा, चर्चा, संवाद, प्रत्यक्ष भेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या निमित्ताने समाजाने अनुभवली.
या निवडणुकीकडे संपूर्ण जैन कलार समाजाचे लक्ष लागलेले आहे. जैन कलार समाज मतदारांनी नागपूर मध्यवर्ती मंडळ निवडणुकीत भरघोस मतदान करून आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन जैन कलार समाज न्यासचे गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष रतन शेंडे, उपाध्यक्ष संदीप दहीकर, सचिव पांडुरंग पेशने, कोषाध्यक्ष अशोक हरडे, सहसचिव वैभव भिवापुरे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.