गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

53

– 47 लोकांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण, गडचिरोली पोलीस व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणुन दृष्टीदोष असलेल्या रुग्णांच्या जीवनातील अंधकार दुर करुन त्यांना नवी दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन रोशनी” हा उपक्रम जिल्ह्रातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर एकुण 11 ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्याचे निश्चित केलेले आहे.
या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील धानोरा, कारवाफा, गडचिरोली (घोट), सिरोंचा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेत्र तपासणी शिबीर पार पडले आहे. यामध्ये 840 हून अधीक नागरिकांनी सहभाग घेतला यापैकी 302 रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, असे निदर्शनास आले. यापैकी धानोरा येथिल दिनांक 04/11/2022 रोजी झालेल्या शिबिरातील एकुण 47 नागरीकांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक 11/11/2022 रोजी यशस्वीरित्या पार पडली. आज गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि ऑपरेशन रोशनी उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील इतर नागरिकांनी घ्यावा व यामध्ये उपविभाग कुरखेडा दि. 15/11/2022, पोस्टे कोरची दि. 17/11/2022, उपविभाग भामरागड दि. 18/11/2022, उपविभाग जिमलगट्टा 22/11/2022, उपविभाग हेडरी दि. 21/11/2022, उपविभाग एटापल्ली दि. 23/11/2022 व प्राणहिता (अहेरी) दि. 29/11/2022 पोलीस दलामार्फत अभियान रोशनीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला आहे, तसेच मोफत उपचार झाल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांनी गडचिरोली पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करुन गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, सोबत डॉ. सतिशकुमार सोळंके, अतिरीक्त शल्य चिकीत्सक, डॉ. आर. व्ही. चांदेकर, नेत्र चिकित्सक, डॉ. सुमित मंथनकर, नेत्र सर्जन, डॉ. राजेश बत्तुलवार, नेत्र चिकित्सा अधिकारी, डॉ. नानाजी मेश्राम, नेत्र चिकित्सा अधिकारी हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा तसेच गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी व नेत्र चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय टीम, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, श्री. महादेव शेलार, प्रभारी अधिकारी नाकृशा, पोउपनि. धनंजय पाटील व ना.कृ. शाखेतील सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.