विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : 27 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मेसर्स लायर्ड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड, सुरजागड आयर्न ओअर खानीच्या वाढीव उत्पादनाबाबत पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी घेण्यात आली. सदर लोक सुनावणीत जिल्हाधिकारी, गडचिरोली, अतिरिक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर, लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. लोकसुनावणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रभावीत 13 गावांच्या मुख्यत्वे पुढील प्रमाणे समस्या मांडल्या.
प्रभावीत 13 गावांच्या मध्यवर्ती जागेवर सुसज्ज दवाखाना बांधण्यात यावा. इंग्रजी माध्यम शाळा महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. स्थानिकांना प्रकल्पामध्ये रोजगार देण्यात यावा. कोनसरी प्रकल्पामध्ये सुद्धा स्थानिकांना रोजगाराबाबत प्राधान्य देण्यात यावे. परिसरातील रस्ते व पुल यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी. प्रकल्पाचे लाल पाणी /गाळ परिसरातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान न होण्याबाबत उपाययोजना करावी. परिसरातील शेतकऱ्यांना सोलर वाटरपंप पुरविण्याची व्यवस्था उद्योगाद्वारे करण्यात यावी. स्थानिक पुरुष व महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योगामध्ये क्षमतेप्रमाणे प्राधान्याने रोजगार देण्यात यावा. परिसरातील शेतामध्ये विंधन विहीरी खोदून देण्यात याव्या. यानुसार प्रकल्प प्रवर्तकाने लोक सुनावणी दरम्यान स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.