तंबाखूजन्य पदार्थ पुरवठादार व उत्पादकांवर कठोर कारवाई करा : मंत्री राठोड

79

– अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत सूचना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हयात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांचा पुरवठा व उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी गडचिरोली येथे विभागाच्या बैठकी दरम्यान दिल्या. वेगवेगळी तंबाखू खर्रा निर्मितीसाठी वापरली जाते. तसेच गुटखाही मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने आपण आता लहान व्यापाऱ्यांबरोबरच जिल्हयात साठा करणारे, त्यांची जिल्हयापर्यंत वाहतूक करणारे व यांच्या मोठ्या उत्पादकांचा शोध घेवून त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई करावी याबाबत मंत्री संजय राठोड यांनी आदेश यावेळी दिले. गडचिरोली आदिवासी दुर्गम भाग असून येथील युवा पिढीबरोबर वयस्क लोकांनाही तंबाखूच्या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागीय कार्यालयांची मदत घेवून संयुक्तिक कारवाई करा. दैनंदिन स्वरूपात वेगवेगळया ठिकाणी भेटी देवून तपासण्यांची संख्या वाढवावी याबाबतही त्यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

हॉटेल तसेच अन्न पदार्थांचे लहान व्यावसायिक दैनंदिन स्वरूपात लागणाऱ्या तेलाचा वापर पुन्हा पुन्हा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. त्यामुळे अशा व्यावसायिकांचीही वेळोवेळी अचानक भेट देवून तपासणी करावी. हॉटेल व्यावसायिकांनी पदार्थ तयार करत असताना त्याचा वापर दिलेल्या मानकांनुसार केला जातो का यासाठी तपासणी मशीनचा वापर वाढवावा याबाबतही मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी बैठकीत सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नीरज लोहकरे, अ. प्र. देशपांडे सहायक आयुक्त अन्न उपस्थित होते.