मल्लमपाड येथील व्यक्तीच्या आत्महत्याबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनावरील आरोप अर्थहीन

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील मौजा मल्लमपाड येथील व्यक्ती नामे अजय दिलराम टोप्पो वय 38 वर्षे यांनी 1 सप्टेंबर 2022 च्या रात्री आत्महत्या केली. याबाबत शासन व जिल्हाधिकारी हे जबाबदार असल्याबाबत त्यांच्या विरोधात जाणूनबुजून, अकारण चुकीचे वृत्त काही माध्यमांमध्येे प्रसिद्ध झाले आहे. वास्तविक पोलीस तपास व पोस्ट मार्टम अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे. तहसीलदार एटापल्ली व पुरसलगोंदी मंडळ अधिकारी यांच्या आवाहलानुसार सदर मृत इसमाच्या नावे शेतजमीन नाही. तसेच सदर मृत व्यक्ती कर्जबाजारी नसल्याचेही आढळून आले आहे. यामुळे प्रशासनाचा प्राथमिक अंदाजानूसार आत्महत्येचे कारण हे घरगुती वाद असल्याचे आहे. प्रशासनाने शेतकरी आत्महत्या व कर्जबाजारी व्यक्ती नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सुरजागड लोह प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या स्थानिकांना कंपनीकडून मदत दिली जाणार आहे. मदतीबाबत कंपनीकडून तशी हमीही देण्यात आली आहे. याबाबत कंपनीकडे मंडळ अधिकारी यांनी नुकसानग्रस्तांची यादीही पाठविलेली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी याबाबत यापुर्वीच कंपनीला सूचना केलेल्या आहेत.
तसेच, सदर मृत व्यक्ती उराव समाजात मोडत आहे. शासनाच्या परिपत्रकानूसार वनहक्क पट्टा मिळण्यासाठी आदिवासी असणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक कागदपत्र अप्राप्त आहेत. तसेच जातीचा दाखला मिळण्यासाठी मागील तीन पिढ्यांचे वास्तव्याचे पुरावे सादर करणे आवश्यक असते. अन्य राज्यातून स्थलांतरीत असल्यास संबंधित राज्य शासनाकडून अर्जदाराच्या वडील किंवा आजोबांना दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यानंतर कागदपत्रांची खात्री पटल्यावर नमुना क-1 मध्ये जातीचे प्रमाणपत्र वितरीत केले जाते.
पात्र नागरिकांना कोणत्याही शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला नाही. शासकीय योजनेत पात्र नसलेल्या मल्लमपाड येथील नुकसानग्रस्तांना कंपनीकडून मदत देण्यासही जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या सुरजागड भेटीत जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार डीएमएफमधील निधी विकासकामांवर खर्च करावा लागतो. या अनुषंगाने सदर जनसभेत त्यांनी स्थानिकांशी चर्चाही केली. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या विरोधातील सदर वृत्त निव्वळ चुकीचे असून अर्थहीन असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले आहे.