– अतुल गण्यारपवार यांची पत्रपरिषदेत माहिती
– निवडणुकीत राकाँ – मनसे – उद्धवसेनेशी आघाडी
– नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून ही निवडणूक जिंकण्यासाठीच रणांगणात उतरलो आहोत. गडचिरोली नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आघाडी केली असून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बिपाशा भुसारे यांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या आघाडीने नगराध्यक्ष पदासह 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. या आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागले आहेत. या आघाडीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 व शिवसेना (उबाठा) पक्षाचे 6 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. संजय ठाकरे, उद्धवसेनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, राकाँ ओबीसी सेलचे शेमदेव चाफले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे, उद्धवसेनेचे नंदू कुमरे, अमोल गण्यारपवार, एजाज शेख, नागनाथ भुसारे, राजेंद्र लांजेवार, करण गण्यारपवार व कार्यकर्ते उपस्थित होते.








