विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात 14 सप्टेंबर रोजी सत्रातील पहिली पालक – शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त उपाध्यक्ष मंगेश पोटवार, पर्यवेक्षक अजय वानखेडे, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी, हरिप्रसाद ग्यानी, सभेचे सचिव प्रशांत मस्कावार, सहसचिव सुकेशनी टेंभुर्णे, विद्यालयाचा प्रतिनिधी आकाश टेकाम व इतर सदस्य होते.
सभेच्या सुरवातीला सरस्वती देवी व साईबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी सत्र 2025 26 करिता कपिल मसराम, लक्ष्मण तुलावी, स्विटी फेबुलवार, महेंद्र कुकुडकर, राजेश्वर मडावी, भारती मडावी, पौर्णिमा मोहुर्ले, रोहिणी देव्हारे, राजेंद्र गोवर्धन व अविनाश वर्गंटीवार या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नवनियुक्त उपाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी सैनिकी विद्यालय म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे घर आहे. ज्यात सर्वच कर्मचारी हे त्यांचे पालक आहेत. त्यामुळे पालकांना कसल्याही प्रकारची चिंता नाही, असे म्हणाले. इथे शिक्षण घेत असल्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक मुलाचे मोबाईलचे व्यसन मात्र सुटले. शिवाय इथल्या सैनिकी शिस्तीमुळे मुले कुठल्या पदावर पोहोचतील माहीत नाही. पण माणूस म्हणून नक्कीच बाहेर पडतील, असेही ते म्हणाले.
पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी यावेळी प्रास्ताविक वाचन केले. क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांनी यावेळी सत्रातील सर्वच खेळामध्ये विद्यार्थ्यांनी कसे यश संपादन केले व राज्यस्तरापर्यंत मजल गाठलेली आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व व्यक्तिमत्व विकास या सर्वांची सांगड घालूनच एक विद्यार्थी परिपूर्ण होत असतो. याच कारणाने विद्यालय या सर्व गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळेच आजही विद्यालयाचे नाव हे विदर्भामध्ये आहे, असे मत व्यक्त करीत प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक मिळवून राज्यात विद्यालयाने कशी ओळख निर्माण केली आहे, हे सुद्धा पटवून सांगितले.
यावेळी प्राचार्यांनी उपस्थित पालकांना विनंती केली की, विद्यार्थी घडवायचं असेल तर एकट्या शिक्षकाने नव्हे तर त्याला पालकांचं सुद्धा तेवढाच सहकार्य गरजेचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार भेटायला येऊन त्यांच्या मानसिकतेत व अभ्यासात व्यत्यय न केल्यास नक्कीच होतकरू विद्यार्थी घडेल, असेही ते बोलले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित गोष्ट नाही, तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांचे परस्पर सहकार्य हे विद्यार्थ्याच्या यशाचा मुख्य आधार असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घेऊन योग्य मूल्ये आत्मसात करावी, त्याचा आत्मविश्वास वाढावा आणि पुढे जाऊन समाजासाठी उपयोगी ठरावे, यासाठी सुद्धा आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे.
आमच्या विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, खेळ, संस्कार आणि नैतिक मूल्ये यांचा समतोल साधून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी शिक्षक आणि पालक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपण वेळोवेळी संवाद साधून विद्यार्थ्यांचे गुण-दोष समजून घेतले, तर त्यांना योग्य दिशा मिळेल, असेही ते म्हणाले
या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली,शिवाय त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर काय उपाय शोधता येईल, यावर ही चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरवातीला संगीत शिक्षक सुनील लोखंडे यांच्या चमूने स्वागत गीताने पालकांचे स्वागत केले.गुणवंतांचे गौरव सुद्धा करण्यात आले.कराटे मधील उत्कृष्ट कामगिरी करिता प्रशिक्षक योगेश चव्हाण यांचेही यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच पालकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राकेश चडगुलवार यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक रवी कोरे यांनी केले. मोठ्या संख्येने यावेळी पालकवर्ग उपस्थित होते.