कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष : सुभाष लांबा

19

– सरकारच्या विरोधात लवकरच आंदोलनाचा बिगुल वाजविणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्या देश विश्वगुरू होत असल्याच्या वल्गना सत्ताधारी करत असले तरी सरकारी कामांचा डोलारा सांभाळणाऱ्या सरकारी यंत्रणेत कर्माचाऱ्यांची कमतरता दिसून येत आहे. संपूर्ण देशात कर्मचाऱ्यांची तब्बल एक कोटीपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. जवळपास सर्वच सरकारी कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात लवकरच आंदोलनाचा बिगुल वाजविण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी शुक्रवारी (ता. ३१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार सोहळा १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला. यानिमित्त शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी या सोहळ्याची माहिती देतानाच देशाची सध्याची स्थिती सांगत सरकारी धोरणांवर कडाडून टीका केली.

सुभाष लांबा पुढे म्हणाले की, उमेशचंद्र चिलबुले यांचे कार्य कर्मचारी संघटनेत उल्लेखनीय आहे. या सोहळ्यात आम्ही पुढच्या आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार आहोत. सध्या सरकारविरोधात सरकारी कर्माऱ्यांमध्ये नाराजी आहे. ८ व्या वित्त आयोगाबद्दल सरकार बोलायला तयार नाही. देशात सरकारी कर्मचाऱ्यांची एक कोटीपेक्षा अधिक जागा रिक्त आहे. फक्त कंत्राटी भरती होत आहे. देशाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे. सरकार उद्योगपतींना सूट आणि गरिबांवर आर्थिक भार देत आहे. देशातील १० टक्के लोकांकडे ७७ टक्के संपत्ती आहे, तर १ टक्क्याकडे देशाची ४० टक्के संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत आधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहे. सरकारने उद्योगपतींचे १८ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. आता याची भरपाई करण्यासाठी सरकार विविध करांत वाढ करत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जात आहेत. पेन्शन योजनेची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. बेरोजगारी प्रचंड वाढत असताना अग्नीवीरसारख्या विचित्र योजना आणल्या जात आहे. या अग्नीवीर योजनेत बाप सेवानिवृत्त होण्याआधी मुलगा सेवानिवृत्त होतो, अशी अवस्था असल्याचे ते म्हणाले.

सरकार रेल्वे, विमान, वीज सगळे सरकारी उद्योग विकत आहे. २५० कोटी नफा देणारी हरियाणा येथील वीज कंपनी सरकारने नुकतीच विकून टाकली. खरेतर सरकारी संपत्ती विकण्याचा अधिकार कुणाला नाही. पण हे राजरोसपणे घडत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर पूर्वी नेहमी आंदोलने व्हायची. पण आता येथे आंदोलन करण्यावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रव्यापी आंदोलन करू, असेही लांबा म्हणाले.

यावेळी विश्वास काटकर यांनी महाराष्ट्रात ८३ हजार कंत्राटी कर्मचारी असून त्यांची सेवा १० वर्षांची होऊनही त्यांना कायम करण्यात आले नाही. तर उमेशचंद्र चिलबुले यांनी महाराष्ट्रात तब्बल अडीच लाख पदे रिक्त असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे उमेशचंद्र चिलबुले, विश्वास काटकर, एकनाथ ढाकणे, कविश्वर बनपूरकर, खुशाल नेवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.