सुरजागड लोहखाणी विस्तारीकरण गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक : अशोकजी नेते

17

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ जानेवारी : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सुरजागड लोहखाणीच्या विस्तारीकरणासाठी आयोजित जनसुनावणीत स्थानिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने आपल्या क्रशिंग आणि स्क्रिनिंग प्लांटची क्षमता 10 एमटीपीएवरून 26 एमटीपीएपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव या जनसुनावणीत मांडला. भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी या जनसुनावणीत मनोगत व्यक्त करताना सुरजागड प्रकल्पाचे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीतील योगदान आहे.

“सुरजागड हा प्रकल्प गडचिरोलीच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक ठरेल. या प्रकल्पामुळे जिल्हा मागासलेपणातून बाहेर पडून देशाच्या औद्योगिक नकाशावर स्थान मिळवेल. याशिवाय स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ज्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल,” असे नेते यांनी सांगितले.

नेते यांनी पर्यावरणीय जबाबदारीवरही भर दिला. जैवविविधतेचे संरक्षण करत शाश्वत विकास साधण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. “हा प्रकल्प गडचिरोलीच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पुढे नेते यांनी जनसुनावणीत बोलत इतिहासाचा दाखला आणि प्रकल्पाची महत्ता सांगत 19 व्या शतकातील इतिहासाला उजाळा देताना सांगितले की, त्याकाळी सुरजागड येथे टाटा समुहाने प्रकल्प उभारण्याचा विचार केला होता. परंतु रस्ते व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा यामुळे तो प्रकल्प साकार झाला नाही. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी बी. प्रभाकरण यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचे भरीव कार्य केले असून, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

सुरजागड आणि हेडरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जनसुनावणीत हजेरी लावली. त्यांनी रोजगार, पर्यावरणीय परिणाम आणि प्रकल्पाच्या प्रभावाशी संबंधित आपली मते मांडली. नागरिकांनी मांडलेल्या शंकांचे निरसन कंपनीच्या वतीने करण्यात यावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. या जनसुनावणीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.