– प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन
– ४१ आश्रमशाळांच्या ११०० खेळाडूंचा विविध स्पर्धेत सहभाग
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी थाटात पार पडले.
क्रीडाज्योत प्रज्वलित करून माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. नामदेवराव उसेंडी म्हणाले, आदिवासी खेळाडू क्रीडा कलागुणांनी निपुण आहेत. खेळातून एकाग्रता निर्माण होते. खेळासोबतच शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय गाठावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उन्नती करण्यातच खरे कौशल्य आहे. शिक्षकांनी आश्रमशाळेत शिकविण्यासोबतच उज्वल भविष्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी गजानन बादलमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्राचार्य परशुराम वांगधरे, अजय आखाडे, भुदेव दास, हेमंत चुधरी, उर्मिला सिडाम, रोशन कुमरे, चंद्रशेखर सिडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुलींनी क्रीडा प्रेरणात्मक नृत्य सादर केले. १९ वर्षीय मुलांचा व्हॉलीबॉलचा उद्घाटनीय सामना कारवाफा व भाडभिडी या बिट संघादरम्यान झाला. यात कारवाफा संघ विजय ठरला. संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील १ हजार १०० खेळाडूंचा सहभाग आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित होणार आहे.
सहभागी खेळाडूंना व पंचांना प्रा. अजय जाधव यांनी शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले. वृत्तलेखन प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक सुभाष लांडे, रविकांत पिपरे, बळीराम जायभाये, धर्मेंद्र कुसराम, आशिष डबाले, मोहन मारबते, निलय गडे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार, नेताजी गावड, पुरुषोत्तम बखर, महेश बोरेवार, अनिल सहारे, जगजीवन शेलोकर, नितीन चंबुलवार , विनायक क्षीरसागर आदींसह मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.