शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक यापुढे खपवून घेतली जाणार नाही

18

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर सर्रास लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र यापुढे शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर होणारी लूट कदापी सहन करणार नाही. आविका संस्था व फेडरेशन हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्तीनुसार हमीभाव धान खरेदी करावे लागते. शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 किलो धान घ्यायचे धोरण आहे. परंतु सर्रास शेतकऱ्यांकडून 41.600 किंवा 42 किलोग्रॅम धान घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केली जाते व क्विंटलच्या मागे अडीच ते तीन किलोची लूट केली जाते. यामुळे शासन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. उलट शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसते.

याच पिळवणुकीला थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबतचा जाब व्यवस्थापक किंवा सचिवांना विचारावा. त्याच क्षणी संबंधित तुम्ही तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला त्या सचिवावर स्वतः तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करू शकता. तसेच धान खरेदी केंद्रावर काटा करताना खरेदी वजनाचे फोटो की व्हिडीओ 9405645963 या नंबरवर पाठवावे किंवा आम्हाला संपर्क करावा. आम्ही तुमची बाजू शासन दरबारी मांडू व पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवू, असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.