– बेरोजगार विद्यार्थ्यांची पत्रकार परिषदेतून मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त अतिदुर्गम म्हणून या महाराष्ट्रात ओळखला जातो या जिल्ह्यात वर्ग (क व ड) च्या पदभरत्या ह्या स्थानिक जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून बेरोजगार विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी केली आहे. जिल्हा स्टेडियम ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवा-युवती यांनी शासनाचे लक्ष लागावे याकरिता मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चाचे नेतृत्व सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
पत्रकार परिषदेला तनुश्री आत्राम सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राहुल भांडेकर ओबीसी संघटना गडचिरोली, शुभम द्यास अकॅडमी गड, बलविरसिंग राठोड, महेंद्र लटारे, आकाश आंबोरकर, संतोषी सुत्रपवार, निकेश तुनकलवार, मनोज पिपरे, वैभव सोमनकर, श्रीमंत मुनघाटे, अजय सोमनकर, सूर्यकांत बारसागडे, कार्तिक टिकले, गोपाल उसेंडी, रोहित दुर्गे यांच्यासह बेरोजगार विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा निवड समिती स्थापन करून त्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्थानिक जिल्ह्यातच भरती करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी केली. बाहेरील जिल्ह्यातील व्यक्ती आमच्या जिल्ह्यात येऊन वर्ग (क व ड) मध्ये नोकरी मिळवून गडचिरोली जिल्ह्यात दोन ते तीन वर्ष सेवा बजावून आपली बदली करून आपल्या स्थानिक जिल्ह्यात चालला जातो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारावर संकट कोसळत आहे. जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी हा शिक्षण घेऊन सुद्धा त्या नोकरी पासून दूर राहत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.