दलितांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये : आमदार डॉ. देवराव होळी

35

– संविधान जागर यात्रा गडचिरोलीत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संविधानाची निर्मिती करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक नव्हे दोनदा उमेदवार देऊन संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचे महापाप काँग्रेस पक्षाने केलेले आहे. देशामध्ये आणीबाणी लागू करून संविधान संपवण्याचे पाप काँग्रेसने केलेले आहे. मात्र हेच संविधान संपविणारे आम्हीच संविधानाचे रक्षक असल्याच्या उलट्या बोंबा करीत असून त्यामध्ये भाजपाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचलेले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी तर जिवंतपणी स्वतःलाच भारतरत्न घोषित केले, मात्र बाबासाहेबांना भारतरत्न देण्यापासून वंचित ठेवले. भारतरत्न देण्याचे काम भाजप सरकारच्या कार्यकाळात झाले. त्यामुळे दलित बांधवांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये.असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे आलेल्या संविधान जागर यात्रेच्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे ऍड. वाल्मिक (तात्या) निकाळजे, राजेंद्र गायकवाड, माजी खा. अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अनु .जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश वालदे, जनार्धन साखरे, प्रा. अरुण उराडे, योजना ठोकले, स्नेहा भालेराव, आकाश अंभोरे, विजय गव्हाळे, नागसेन पुंडके, देवाजी लाटकर यांच्यासह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दलित बांधवांच्या मताचा व बाबासाहेबांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी व सत्तेसाठी केलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत संविधानाला ८५ वेळा घटनादुरुस्तीच्या नावावर बदलविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या फायद्यासाठी अनेकवेळा संविधानाला बदलविले आहे. याउलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने बाबासाहेबांना सन्मान देत त्यांच्या स्मरणार्थ लंडन येथील घर, इंदू मिलची जागा व भव्य स्मारक, बाबासाहेबांचे मूळ गाव असलेले महु येथे भव्य स्मारक उभारले आहे. बौद्ध बांधवांच्या, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे दलित बांधवांनी काँग्रेस व भाजपमधील अंतर समजून घेण्याची आवश्यकता असून काँग्रेसच्या या खोट्या भूलथापांवर विश्वास न ठेवता त्यांना योग्य शब्दात उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.