आव्हान पेलणारे विद्यार्थी आश्रमशाळेत घडवा

67

– अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे आवाहन ; शिक्षकांना गुरुशाला प्रशिक्षण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना बोलके करून गुणवत्ता वाढवा. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यात इंग्रजी भाषा अडसर होऊ नये, यासाठी प्रत्येक शिक्षकांनी स्वतःला अद्यावत ठेवून इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांशी संवाद करावा. आश्रमशाळेतील शिक्षण शैलीत आता आमुलाग्र बदल करणे काळाची गरज असून आव्हान पेलणारे विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य नव्या जोमाने शिक्षकांनी करावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.

आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी १९ व २० जुलै रोजी आयोजित दोन दिवसीय गुरुशाला प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात ते मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.

समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभाग नागपूर अपर आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, गुरुशाला शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक विकास चौधरी, प्रथम फाउंडेशनचे तज्ञ मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ४ अपर आयुक्त कार्यालय स्तरावर ३० प्रकल्पातील सर्व शासकीय आश्रम शाळेत आदिवासी विकास आयुक्त नाशिक व प्रथम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरूशाला उपक्रम येत्या ३ वर्षाकरिता या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अपर आयुक्त कार्यालय नागपूर अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, भामरागड नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर या ९ प्रकल्पातील ७६ शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीला शिकविणारे सुमारे ८०० शिक्षक तसेच १४२ अधीक्षक, अधीक्षिका यांच्यासाठी क्रमाक्रमाने गुरूशाला प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांतील इयत्ता सहावी ते बारावीला शिकविणाऱ्या १८२ शिक्षकांना वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणात शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात ग्राउंड रुल्स तयार करणे, क्लासरूम मॅनेजमेंट कमिटी तयार करणे व विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षण शैलीचा नकाशा तयार करणे, विद्यार्थ्यांसोबत सामूहिक उपक्रम राबविणे, सकारात्मक दृष्टिकोन, खेळाच्या माध्यमातून शिक्षण देणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती, ताणतणाव व्यवस्थापन, कृतीयुक्त स्वयं अध्ययन, बुलेटीन बोर्ड तयार करणे, माझी शाळा माझा स्वाभिमान,विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

गुरुशालाच्या वतीने तज्ञ मार्गदर्शक म्हणून आर. के. मिश्रा, तथिर, श्वेता जैन, निदा, गौरव, श्रीष्टी, संदीप यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीच्या वतीने संदीप दोनाडकर, माला सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन एपीओ संदीप शेंडे तर एपीओ गिरीजा उईके यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी वृत्तलेखन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बी.एल.वाटाणे, शरद बनसोड,विद्येश्वरी ढोके, चंद्रकला शोभणे, लक्ष्मी लोखंडे, राहुल तोमस्कर आदींनी सहकार्य केले.