पराभवाने खचून न जाता जनतेच्या सेवेतच राहणार ; मावळते खा. अशोक नेते यांचा निर्धार

41

– जनताजनार्दनाचा कौल मान्य ; 4,76,096 मतदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मानले आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विजय हा पचवला पाहिजे आणि पराजय स्वीकारला पाहिजे. या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मी स्वीकारून पुन्हा जनतेची सेवा करण्याकरिता कामाला लागत आहे. हा पराजय म्हणजे आयुष्यातील एक अल्पविराम आहे. त्यामुळे पराभवाचे शल्य न ठेवता नव्या उमेदीने कामाला लागणार आहे. माझ्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मेहनत घेणाऱ्या भाजपसह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि इतर सर्व घटकांचा मी ऋणी आहे, अशी भावना गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे मावळते खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत खा. नेते यांना मतदान करणाऱ्या 4 लाख 76 हजार 96 मतदारांचे त्यांनी विशेष आभार मानले. गेल्या 10 वर्षांपासून मतदारांनी आपल्या पाठिशी उभे राहून जो विश्वास दाखविला तो पुढील काळातही कायम राहिलच,ताम्रपत्र घेऊन कोणीही आलेला नाही त्यामुळे विजय हा पचवला पाहिजे आणि पराजय स्वीकारला पाहिजे.जनता जनार्दनाचा दिलेल्या कौल मी स्वीकारतो आणि पुन्हा जनतेची सेवा करण्याकरिता कामाला लागतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रात पुन्हा भाजपच्या नेतृत्वातील सरकारची स्थापना होत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या क्षेत्रात जनहिताची कामे करण्यासाठी मी प्रयत्नरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळींची आठवण करून देत त्यांनी पराभवाने खचून न जाण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या ओळी अशा आहेत,

‘क्या हार में क्‍या जीत में,
किंचित नहीं भयभीत मैं,
संघर्ष पथ पर जो मिले,
यह भी सही वह भी सही।’

ही कामे विसरता येणार नाहीत. खासदारकीच्या 10 वर्षाच्या काळात आणि त्यापूर्वी आमदार असताना गडचिरोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या काही कामांचा यावेळी अशोक नेते यांनी उल्लेख केला. त्यात प्रामुख्याने वडसा – गडचिरोली या रेल्वेमार्गाची मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाला सुरूवात, गडचिरोली-भानुप्रतापपूर (छत्तीसगड) आणि गडचिरोली ते सिरोंचा व अदिलाबाद (तेलंगणा) या नवीन रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मार्गी लावणे, नागभिड ते नागपूर रेल्वेमार्गाचे ब्रॅाडगेजमध्ये रूपांतर, नागभिड ते काम्पा-टेम्पा, वरोरा रेल्वेमार्गाला मंजुरी, गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॅालेजला मंजुरी, कोनसरी (सुरजागड)लोह प्रकल्प उभारणीसाठी योगदान, गोंडवाना विद्यापीठाच्या उभारणीतील योगदान, चिचडोह-कोटगल बॅरेजसारख्या सिंचन प्रकल्पांची उभारणी, वनक्षेत्रामुळे सिंचन प्रकल्पांसाठी असलेली अडचण लक्षात घेऊन सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी मंजूर केलेले पूलवजा बंधारे आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या 12 हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गांची उभारणी,हवाई पट्टी प्रस्ताव मंजूर, ही कामे आपल्या कार्यकाळात झाल्याचे समाधान असल्याचे अशोक नेते यांनी आवर्जुन सांगितले.