कुणबी महामोर्चासाठी समाज बांधव एकवटले

64

– ठिकठिकाणी सभांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यात मराठा समाजाच्यावतीने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे. ही मागणी कुणबी समाजासह ओबिसींवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे राज्यातील कुणबी समाजासह ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा विरोध दर्शवित आहेत. याच मागणीला घेऊन जिल्ह्यात कुणबी समाजाच्या वतीने ५ ऑक्टोबरला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव एकवटले असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सभांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून कुणबी बांधवांसह ओबीसी समाज बांधव महामोर्चात सहभागी व्हावे यासाठी अनेक ठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. महामोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन शासनाला सादर करण्यात येणार आहे. शासनाने ओबिसींवर सातत्याने अन्याय करीत असल्याने शासनाप्रती समाज बांधवांमध्ये रोष व्यक्त केला आहे. राज्यात ओबीसींसाठी ७२ वसतिगृह मंजूर केले. मात्र अजूनपर्यंत ते सुरू करण्यात आले नाही. यासोबतच किरायाने राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू केली नाही. पेसाच्या माध्यमातून जिल्ह्यात आदिवासी, गैरआदिवासीमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे. यात सुधारणा करून ओबीसी समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणीही या महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अशा विविध मागण्यांची माहिती गावातील नागरिकांना देऊन जनजागृती करण्याचे काम होत आहे. या महामोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.