– राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती
– ३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व १३७ जनांना आचार्य पदवी होणार प्रदान
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ बुधवार, ५ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे तसेच गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराचा कोनशीला समारंभ महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे गोंडवाना विद्यापीठातून होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून श्रीमती द्रोपदी मुर्मू दीक्षांत भाषण करतील, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, यांनी विद्यापीठाच्या मिटींग हॉलमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रपरिषदेला प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल चिताडे, डॉ. देवेंद्र झाडे उपस्थित होते.
या समारंभात महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे अध्यक्षस्थान भूषवतील तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित नवीन परिसराचा कोनशीला समारंभ अडपल्ली येथे १७७ एकरातील परिसर प्रगती, नाविन्य आणि अमर्याद शक्यतांचे प्रतिक आहे. २०२५ – २६ पर्यंत अडपल्ली येथील १७७ एकर जागेवर नवीन विद्यापीठ परिसराचा विकास करण्याचा मानस आहे. १७० एकर जागा अधिग्रहित करण्यात आला असून ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १८४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरासाठी उपलब्ध नवीन परिसरात विविध विभागाच्या इमारती, प्राध्यापक इमारती व प्रयोगशाळा इमारत साकारण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यावेळी दिली.
”या समारंभात ऐकूण गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी २७८, प्रथम गुणवत्ताप्राप्त विद्याथी ६२, सुवर्णप्राप्त विद्यार्थी ३९ तर आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थी १३७ आहेत. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 8, मानव विज्ञान विद्याशाखा ५४, आंतर विज्ञान विद्याशाखा ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठात पदवी प्राप्त तब्बल ० हजार ५३५ आहेत. यात पदवीचे १५ हजार २३० रज पदव्युत्तर ५ हजार ३०५ विद्यार्थी आहेत.”