राष्ट्रसंताचे विचार घराघरात पोहचवा : योगीताताई पिपरे

66

– रामनगर येथे महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह महोत्सव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अशा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाची आज समाजाला गरज असून राष्ट्रसंतांचे विचार व त्यांची ग्रामगीता घराघरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने दररोज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात ही सामाजिकतेची बाब असून निरंतर सुरु असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी केले . पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समाज प्रबोधनाचे मोठे काम केले. आज समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करून चांगले सद्गुण युवकांमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज आहे. असेच कार्यक्रम शहरासह गावागावात घेणे काळाची गरज आहे, असेही योगीताताई पिपरे म्हणाल्या.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह कार्यक्रम सुरू आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 18 नोव्हेंबर रोजी गडचिरोली शहराचे माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्या तथा कवयित्री कुसुमताई आलाम होत्या. महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाला प्रामुख्याने सुधाताई चौधरी, सौ. आत्राम, भाजप महिला आघाडीचे जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, गुरुदेव सेवा मंडळाच्या मंदाताई मांडवगडे, भाजपच्या गडचिरोली शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, भावनाताई हजारे, रश्मी बाणमारे व गुरूदेव सेवा मंडळाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर येथे दरवर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून दररोज सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी काढण्यात येते व त्यानंतर भजन कीर्तन व प्राथनेचा कार्यक्रम घेतला जातो. दररोज सायंकाळी सुद्धा विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये रामनगरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. अशा पद्धतीने संपुर्ण सप्ताहात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात.