– गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील समन्वय बैठकीचे आयोजन
– जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे 400 पोलीस पाटलांची उपस्थिती
– पोलीस पाटील यांची वैद्यकिय पथकाकडून आरोग्य तपासणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : बदलत्या परिस्थितीनुसार गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये पोलीस पाटील यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था टिकवण्यावर सर्व पोलीस पाटील यांनी प्रामुख्याने भर द्यावा. गडचिरोली पोलीस दल सर्व पोलीस पाटील यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून पोलीस पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गडचिरोली जिल्हा आता माओवादापासून मुक्त झाला आहे. माओवादग्रस्त जिल्हा ही ओळख संपवून गडचिरोली जिल्हा आता विकासाकडे वाटचाल करत आहे. यासाठी आपण सर्वांनी समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.
गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद जवळजवळ संपूष्टात आला असून जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागातील नागरिकांशी समन्वय साधण्यासाठी पोलीस पाटील ह्या पदावर असलेला व्यक्ती मुख्य भूमिका निभावत असतो. गावामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, अंधश्रद्धा, गंभीर गुन्हे, काळी जादू, गावातील भांडणे इत्यादी कारणावरुन घडत असलेल्या विविध गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. पोलीस पाटील हा सामान्य जनता व पोलीस प्रशासन यामधील महत्वपूर्ण दुवा असून गावागावात पोलीसांच्या कार्याचे प्रतिनिधीत्व पोलीस पाटील करीत असल्याची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आज, 9 मे 2026 रोजी जिल्ह्यातील विविध गावातील पोलीस पाटील यांच्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश बोलत होते.

सदर कार्यशाळेकरिता जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे 400 पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांचे कर्तव्य व त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, गंभीर गुन्हे व व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामाजिक सलोख्याची जपणूक, अंधश्रद्धा जनजागृती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच सदर समन्वय बैठकीदरम्यान आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित सर्व पोलीस पाटील यांची पोलीस रुग्णालय गडचिरोली येथील वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर समन्वय बैठकीप्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. स्वप्निल इज्जपवार, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. योगराज नाकाडे व महिला जिल्हाध्यक्ष गाव कामगार संघटना श्रीमती लता ऊईके यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी स्थागुशाचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.





