विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी ७६.२७ टक्के लागला असून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला आहे. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या विद्यालयातील संस्कृती किशोर सातारे हिने ८७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पूर्वा जगन्नाथ निकुरे हिने ८६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर आशा देवानंद बोटरे हिने ८३.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. याशिवाय इतर विद्यार्थिनींनीही समाधानकारक यश मिळवत विद्यालयाचा गौरव वाढविला.
यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थाध्यक्ष आदिवासी सेवक घनश्यामजी मडावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेश चुर्हे, नीरज धोडरे, राजीव पिलारे, दिगंबर मैंद, सीमा कोहळे तसेच धनराज ठेमस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना घनश्यामजी मडावी यांनी विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे सांगितले. शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन असून विद्यार्थिनींनी उच्च ध्येय ठेवून पुढील शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थिनींच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा निकाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यालयाच्या यशाबद्दल शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील नागरिकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







