Home गडचिरोली संत निरंकारी मंडळाद्वारे 24 एप्रिलला देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिर

संत निरंकारी मंडळाद्वारे 24 एप्रिलला देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिर

14

– 23 एप्रिलला संत निरंकारी सेवादलद्वारे जनजागृती रॅली

– जनतेने रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदानाचे महान कार्य करावे : किशन नागदेवे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक संत निरंकारी मंडळाच्या शाखेद्वारे शुक्रवार, 24 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आरमोरी मार्गावरील देसाईगंज (वडसा) येथील संत निरंकारी सत्संग भवनात सद्गुरू बाबा गुरुबचनसिंगजी महाराज व अन्य हुतात्म्यांच्या स्मृतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील सर्वसाधारण, गोरगरीब रुग्णांना रक्त टंचाई भासू नये म्हणून जिल्हा रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी मंडळाद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिक शाखेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करून मानव सेवेचे कार्य केले जाते. देशात तसेच जिल्ह्यात रक्तदान करण्यात संत निरंकारी मंडळ अग्रस्थानी आहे.

मागील पाच वर्षांत कोविड महामारीच्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाच्या विनंतीवरून देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनुक्रमे 160, 130, 170, 254, 188, 249 युनिट रक्त शासकीय जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केला होता.

यावर्षीही देसाईगंज (वडसा) येथील रक्तदान शिबिरात भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. जवळपास 250 -300 महिला, पुरुष रक्तदान करतील, अशी अपेक्षा संत निरंकारी मंडळाचे झोनल इन्चार्ज श्री किशन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे.

जनजागृतीसाठी गुरुवार, 23 एप्रिल रोजी संत निरंकारी सेवादलद्वारे जनजागृती रॅली संपूर्ण शहर परिसरात काढण्यात येणार आहे. त्यात जवळपास 100 महिला, पुरुष सेवादल गणवेशात सहभागी होतील. सर्व मानवप्रेमी जनतेने रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदानाचे महान कार्य करावे, अशी विनंती संत निरंकारी मंडळाचे झोनल इन्चार्ज श्री किशन नागदेवे यांनी केली आहे.

error: Content is protected !!