खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांनी स्वतःकडे घ्यावा

17

– मृतकाच्या आईची पत्रकार परिषदेत मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील बोळधा येथील २६ वर्षीय युवक प्रशांत रामदास उरकुडे याची हत्या करण्यात आल्याची घटना १८ एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आली होती. याबाबत आरमोरी पोलिस स्टेशन येथे मृताच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. मात्र लेकाच्या खुन्यांना पोलिसांनी अद्याप गजाआड न केल्याने आई मुक्ताबाई उरकुडे यांनी ३० जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतच हंबरडा फोडत पोलिस अधीक्षकांनी या खून प्रकरणाचा तपास स्वतःकडे घेऊन सखोल चौकशी करून आरोपींना गजाआड करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

या पत्रकार परिषदेत मुक्ताबाई उरकुडे प्रकरणाची माहिती देत म्हणाल्या की, मुलगा प्रशांत याचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबध होते. मात्र तिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देण्याचा तिच्या परिवाराचा बेत होता. दरम्यान, गावात रामनवमीची मिरवणूक असल्याने गावातील सर्व व्यक्ती त्यात व्यस्त होते. मृतक प्रशांत सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झाला होता. दरम्यान, २२ एप्रिल २०२४ रोजी माझे नातेवाईक माझे लग्न बळजबरीने दुसऱ्याशी लावून देणार आहेत. त्यामुळे गावाच्या बाहेर भेटण्यासाठी तू ये, असे त्या तरुणीने प्रशांतला फोनवर सांगत बोलावले. याबाबतचे संभाषण मी ऐकले तेव्हा प्रशांतला एवढ्या रात्री बाहेर जाऊ नको, असे सांगितले होते. यापूर्वी सुद्धा त्या तरुणीच्या नातेवाईकांनी मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. प्रशांत झोपण्याचा बहाणा करून घरीच राहिला. पण मला झोप लागल्यानंतर तो केव्हा निघून गेला हे मला समजले नाही. रामनवमीची मिरवणूक संपल्यानंतरही माझा मुलगा घरी आला नाही. त्यामुळे मोठ्या मुलाने त्याची शोधाशोध केली असता कुठेही आढळला नाही. सकाळच्या सुमारास विजय राऊत यांच्या शेतामध्ये प्रशांतचा मृतदेह आढळून आला. ही घटना त्या तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या आकसातून झालेली आहे. तिचे वडील व नातेवाईक यांनीच माझा मुलगा प्रशांतचा खून केला आहे, अशी आपबिती मृतकाची आई मुक्ताबाई उरकुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी उलटला. पण अद्याप या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी झाली नाही. आम्ही संशय व्यक्त केलेल्या संशयितांचीही चौकशी करण्यात आली नाही. माझ्या मुलाचे मारेकरी अद्याप मोकळे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षकांनी स्वतःकडे वर्ग करून सखोल चौकशी करावी व आरोपींना अटक करावी, अशी मागणी मुक्ताबाई उरकुडे यांनी केली. त्यांनी याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे आता पोलिस अधीक्षक या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून प्रशांतच्या खुन्यांना अटक करतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.