– विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : विज्ञानाने खूप क्रांती केली आहे. विज्ञानाच्या भरोशावर जगाने यशाचे अनेक शिखरे पादाक्रांत केले आहे. असे असतानाही ग्रामीण भागासहीत शहरी वातावरणात देखील अंधश्रद्धेचा पगडा अजूनही काही प्रमाणात आहे. बालमन विकसित होण्यासाठी घरातील वातावरण फार महत्त्वाचे असते. यासाठी बालमनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व संशोधक प्रवृत्ती वाढीसाठी शालेय विज्ञान प्रदर्शनी महत्वाची असल्याचे प्रतिपादन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते उद्घाटक म्हणून बोलत होते*
देसाईगंज तालुक्यातील विसोरास्थित विनायक विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन १८, १९ ते २० डिसेंबरपर्यंत करण्यात आले. या प्रदर्शनीचा उद्घाटणीय समारंभ आज, १८ डिसेंबर रोजी पार पडला. त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रिती डुडुलकर होत्या. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक सेवानिवृत्त प्राचार्य हरिभाऊ पाथोडे, प्रा. डाॅ. आशिष सेलोकर, विशेष अतिथी म्हणून डाॅ. अशोक गहाणे, वन्यजीव प्रेमी प्रविण कायरकर, पोलिस पाटील भामिला शहारे, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे, विनायक शिक्षण संस्थेचे सचिव भय्या नाकाडे, प्राचार्य बि. ए. ठाकरे, मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे, गटसमन्वयक एकनाथ पिलारे, केंद्रप्रमुख आनंद गुरनुले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
दरम्यान हरिभाऊ पाथोडे यांनी चमत्कारिक स्वरुपाचे विविध प्रयोग सादर करून बुवाबाजीपासून कशी फसगत होते आणि यातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात हे प्रात्यक्षिकांद्वारे समाजातून सांगितले. याशिवाय डॉ. शेलोकर यांनीही अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या आविष्कारावर प्रकाश टाकला. डॉ. गहाणे यांचेही मार्गदर्शन झाले.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे यांनी केले. सदर विज्ञान प्रदर्शनीत एकुण ५७ संशोधन प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. तिन गटात लावून असलेल्या या प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन विज्ञान शिक्षक अतुल बुराडे यांनी तर आभारप्रदर्शन गटसमन्वयक एकनाथ पिलारे यांनी केले. यशस्वीतेसाठी विनायक विद्यालय विसोरा व गट साधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.