– गडचिरोलीसह ९ प्रकल्पांचा समावेश : शिबिरात ३४२ खेळाडूंचा कसून सराव
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर आता १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी बुधवार, १८ डिसेंबर रोजी प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर गडचिरोली प्रकल्पाचे ३४२ खेळाडू बसने रवाना झाले.
विभागीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी गडचिरोली प्रकल्पातील ३४२ खेळाडूंनी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर कसून सराव केला. यासाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लागलीच १६ ते १८ डिसेंबर पर्यंत तीन दिवसीय क्रीडा सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ब्रह्मपुरी येथे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, वर्धा, भंडारा व देवरी अशा ९ प्रकल्पातील खेळाडूंचा समावेश आहे. प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर यांनी क्रीडा सराव शिबिराचे नियोजन केले होते. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची तयारी करून घेण्यात आली.
क्रीडा सराव शिबिरासाठी कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळांमधून ३४२ खेळाडूंची निवड करण्यात आली. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचा सराव करण्यात आला.