शुक्रवारपासून आश्रमशाळा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा

61

– आदिवासी विकास विभाग : ११०० खेळाडू दाखविणार कौशल्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शुक्रवार, १३ डिसेंबरपासून सुरू होत आहेत.

१३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील ४१ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे आदिवासी खेळाडू क्रीडा कौशल्य व नैपुण्यता दाखविणार आहेत.

क्रीडा संमेलनाचे उद्घाटन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते १३ डिसेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे राहणार आहेत.

यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील खेळाडू सहभाग घेणार आहेत. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.

पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी नाजुक उईके यांच्या हस्ते १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, संतोष कन्नाके, मुकेश गेडाम, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे आदींसह सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.