गडचिरोली विधानसभा मतदारसंघात ३६२ पथके रवाना

33

– सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हाधिकारी संजय दैने व पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३६२ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व पथके मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत रवाना झाली.मतदान पथके रवाना होताना मंगळवारला गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

३६२ मतदान पथकातील ८७ पथके सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी बेस कॅम्पवर रवाना झाली. ८७ पथकातील १३ पथके हेलिकॉप्टरमधून, ६४ पथके बस व १० पथके जीपमधून रवाना झाली तर मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी २७५ पथके रवाना झाली. २७५ पथकातील १९५ पथके बस तर ८० पथके जीपमधून रवाना झाली. २७५ पैकी २९ पथके मंगळवारला बेस कॅम्पवर रवाना झाली तर थेट मतदान केंद्रावर २४६ पथके रवाना झाली. दोन्ही दिवस मिळून एकूण ३६२ मतदान पथकांपैकी ११६ पथके बेस कॅम्पवर रवाना झाली.

येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व मतदान पथकांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या उपस्थितीत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट व इतर आवश्यक सर्व साहित्यांचे वितरण करण्यात आले. साहित्य वितरणासाठी १८ टेबलवर व्यवस्था करण्यात आली होती. मतदान पथक रवाना स्थळी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळखपत्र वाटप पथक, मतदान पथकाचे आदेश वितरण पथक, वाहतूक व्यवस्था पथक यांनी आपले काम व्यवस्थित पार पाडले. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यावर असल्याच्या प्रमाणपत्राचे ( ईडीसी) वितरण करण्यात आले. पथके रवाना होताना कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासण्यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक सुद्धा कार्यरत होते.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात गडचिरोली, धानोरा ,चामोर्शी हे तीन तालुके समाविष्ट असून एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार आहेत. यात पुरुष मतदार १ लाख ५४ हजार ६१० , स्त्री मतदार १ लाख ५२ हजार ६१० तर ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी केले आहे. साहित्य वाटप व पथके रवाना स्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी ) अमित रंजन, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान, नायब तहसीलदार डी. ए. ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.