शिक्षक दिनावर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार

45

– शाळेची वेळ ११ ते ५ करण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ करण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून बहिष्कार टाकणार आहेत.

सध्या आश्रमशाळेची वेळ सकाळी ८.४५ ते सायंकाळी ४ अशी असल्याने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर वेळ अत्यंत अडचणीची व गैरसोयीची आहे. आदिवासी विकास विभागाने अत्यंत आडमुठेपणाचे धोरण अवलंबून सदरची वेळ कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या माथी मारलेली आहे. शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ अशी करण्यात यावी यासाठी सीटू संघटनेच्या वतीने वेळोवेळी सनदशीर मार्गाने शासनास व प्रशासनास लेखी निवेदन, प्रत्यक्ष भेटीद्वारे अवगत केले आहे. तसेच आझाद मैदान मुंबई येथे २३ऑगस्ट २०२३ व २२ जुलै २०२४ रोजी दहा हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी राज्यभरातून सहभागी होऊन दोनदा भरपावसात धरणे आंदोलन केले.

सध्याची वेळ बदलण्याबाबत आदिवासी विकास विभाग शासन – प्रशासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना या गैरसोयीच्या वेळेमुळे वेठीस धरलेले आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळा फिती लावून बहिष्कार टाकणार आहेत, असे आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे यांनी कळविले आहे.

या बहिष्कारामध्ये आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्यकारिणी मार्फत तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांनी केले आहे.